श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये, कांदळगाव मध्ये साजरे केले जाणारे सण/उत्सव :
नववर्ष पाडवा ते रामनवमी उत्सव :
कांदळगावच्या रामेश्वरच्या रामनवमीचा प्रारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होतो. दुपारी ११ वाजता सर्व मानकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नववर्षाची गुढी रामेश्वर मंदिरात वाजत गाजत चैतन्यपूर्ण वातावरणात उभारली जाते व त्यानंतर गावात सर्वत्र घरोघरी गुढ्या उभारल्या जातात ही गावाची परंपरा अद्याप चालू आहे.
दररोज रात्रौ पुराण वाचन, त्यानंतर रामेश्वराचा अवसर काढणे व रामेश्वर मंदिरापासून देवी सातेरी मंदिरासह परिसरातील सर्व मंदिरांना भेटी देणे हा पालखी सोहळा अत्यंत नयनरम्य असतो. त्यानंतर रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. यावेळी गावातील गायक व हरिदास भक्तीगीते, नाटयगीतांचे गायन करतात. त्यानंतर पालखी मंदिरात जाते व रामेश्वर गादीवर आसनस्थ होतात व प्रजाजनांना आशीर्वाद देतात. भाविकांच्या अडी-अडचणी करणे इत्यादी चालू असताना हरिदास बुवा आपले कीर्तन चालू करतात. काही वेळानंतर रामेश्वर गाभा-यात जाऊन विसर्जित होतो. अशा प्रकारची परिक्रमा पाडव्यापासून चालू होते.
चैत्र शुद्ध नवमी हा रामजन्म सोहळयाचा उत्सव. सकाळी सनईच्या मंजुळ स्वरात या सोहळयाचा प्रारंभ होतो. दुपारी हरिदास आपले रामजन्मावर आधारीत कीर्तन चालू करतात. भाविक ग्रामस्थ व अनेक दूरदूरचे भक्तगण या सोहळ्यास उपस्थित रहातात. संपूर्ण मंदिर खचाखच भरून जाते. दुपारी ठिक १२.३० वाजता रामजन्म झाल्याचे कीर्तनकार जाहीर करतात.
“का ग सखे, माथ्यांनी सूर्य थांबान
रामजन्मला गं सखे राम जन्मला ”
हे गीत रामायणातील गाणे ध्वनिक्षेपणावर वाजू लागते. ढोल ताशांचा गजर होतो. गुलाल उधळला जातो. संपूर्ण आसमंत दुमदुमला जातो. रामेश्वर मंदिर परिसराला अयोध्या नगरीचे स्वरुप प्राप्त होते. त्यानंतर मंदिराभोवती पालखी सोहळ्याची प्रदक्षिणा पूर्ण होते. यावेळी सुंठावड्याचे वाटप केले जाते व महाप्रसाद चालू होतो. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेतात. रात्रौ पुराण वाचनाने कार्यक्रम चालू होतो. पालखी प्रदक्षिणा मंदिराला पूर्ण झाली की रामेश्वर पालखी मानकरी व जनतेसह सातेरी मंदिर व इतर मंदिराना भेटी देतात. वाटेत पारंपारिक वाजंत्री आपली अदाकारी सादर करतात. हडी गावचे कावले घराणे व इतर ग्रामस्थ आपल्या पारंपारिक मैदानी खेळांचे नयनरम्य प्रकार सादर करतात. फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण आसमंत दुमदुमते व उजळून निघते. पुन्हा रामेश्वराची स्वारी मंदिरात येते व गादीवर स्थानापन्न होते. कीर्तनकार आपले कीर्तन चालू करतात व काही वेळातच न्हिवे वाडीतील ग्रामस्थ आपल्या नाटकाचे सादरीकरण करतात. अशाप्रकारे अत्यंत उत्साहात रामनवमीची रात्र संपते. सकाळी पुन्हा रामेश्वर गादीवर आरूढ होतात व हरिदासाच्या लळीताने रामनवमी उत्सव समाप्त होतो.
श्रावणी महोत्सव :
श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची गर्दी असते. सोमवारी परिसरातील भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी येतात व आभिषेक, लघुरुद्र, नैवेद्य इत्यादी धार्मिक विधी सेवारुपाने करतात. रात्रौ स्थानिक भजने सादर केली जातात. रामेश्वर मंदिरापासून नजीकच असलेल्या सीमा देवाच्या स्थळी सीम्याची जत्रा भरते. व या जत्रेत सीमा देवाला भाकरी व मिरचीचा नैवेद्य देवाला ग्रामस्थ अर्पण करतात. व ही जत्रा रामेश्वराच्या संमतीने मानकरी श्रावण महिन्याच्या अखेरीस संपन्न करतात. व या जत्रेत गावातील सर्व ग्रामस्थ आपली उपस्थिती लावतात. शेवटच्या सोमवारी मंदिरात श्री सत्यनाराणाची महापूजा आयोजित केली जाते. व रात्रौ भजने व इतर करमणूकीचे कार्यक्रम सादर केले जातात.
वार्षिक राखण सोहळा :
भाद्रपद कृष्ण द्वादशी या तिथीला मानकरी व ग्रामस्थ रामेश्वर मंदिर येथे देवाला गा-हाणे करून ५ किमी अंतरावर कांदळगावची वाडी असलेले महान या गावी गांगेश्वर मंदिर येथे वाजत गाजत पायी चालत जातात. मंदिराचे मानकरी ग्रामस्थांचे स्वागत करतात. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. गांगेश्वराचा कौल घेवून नंतर रामेश्वर व गांगेश्वराचा अवसर काढला जातो व संपूर्ण गावाला व भक्तजनाना वर्षभर पुरणारे आत्मिक बळ निर्माण केले जाते. यालाच राखण असे म्हटले जाते. त्यानंतर गांगेश्वर आपल्या सर्व स्थळांना भेटी देतो व त्यानंतर रामेश्वर महान गावातील जनतेला वर्षभर पुरुन उरेल एवढे पाल्याचे अन्न देतो व राखणीचे श्रीफळ बाराच्या पूर्वसाच्या कुडीच्या हातात सुपूर्द करुन उपस्थित रयतेला निरोप देतो. त्यानंतर सर्व रयत पुन्हा कांदळगावी मार्गस्थ होते. शिवकालीन बाणघाटीमार्गे मजल दरमजल करीत सायंकाळी सातेरी मंदिरात श्रीफळाचे प्रस्थान होते. यालाच राखण आणली असे म्हणतात. त्यां रात्रीपासून सातेरी मंदिरात जागर चालू होतो. रात्रौ स्थानिक भजने होतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला सातेरी मंदिरात घटस्थापना होते. दररोज पुरोहित धार्मिक विधी व नैवेद्य देवीला अर्पण करतात.
वार्षिक दसरोत्सव :
अश्विन शुद्ध दशमीला रामेश्वर मंदिरात दसरोत्सवाला प्रारंभ होतो. दुपारी ४ वाजता रामेश्वर मंदिरातून रामेश्वर, गांगेश्वर, सातेरी, रवळनाथ, कमरादेवी यांची तरंगासह वारेसुत्रे व इतर सह- वारेसुत्रासह तमाम रयत सोबत घेवून सातेरी मंदिराकडे प्रयाण करतात. मंदिराशेजारी मोठे आपट्याचे झाड आहे. त्याची विधिवत पूजा करुन शिवलग्नांचा सोहळा संपन्न होतो. नंतर सारे लोक सोने लुटतात. सर्व वारेसुत्रे तरंगासह सातेरी मंदिरात येतात व पुन्हा रामेश्वर मंदिरासमोरील प्रसिद्ध मांडात स्थिरावतात व रयतेला आशीर्वाद देतात. त्यांच्या अडी-अडचणीचे निवारण करतात. दुस-या दिवशी देव स्वारी सातेरी मंदिरात येते व सर्व वारेसुत्रे आपले तरंग मंदिरात ठेवून प्रस्थान ठेवतात.
दुपारी महाप्रसाद होतो. त्यानंतर पुन्हा रामेश्वर आपल्या वारेसुत्रासह मांडात येतो व पुन्हा जनतेच्या अडी-अडचणींचे निवारण करण्यात येते. असा कांदळगावातील प्रसिद्ध दसरा पाच दिवस चालतो. दूरदूरचे अनेक भक्त या दस-याला उपस्थित रहातात व दस-याचा आनंद लुटतात.
कोजागिरी पौर्णिमेच्या दुस-या दिवशीपासून पहाटे ५ वाजता काकड आरती रामेश्वर मंदिरातून निघते. ती सातेरी मंदिरासह मानकरी ओवाळणी करते. या आरतीला गावातील अनेक ग्रामस्थ, उपस्थित असतात. ती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत नियमित चालू असते.
अखंड हरिनाम सप्ताह :
कार्तिक महिन्यातील कार्तिक शुद्ध पंचमी ते द्वादशीपर्यंत रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह चालू होतो. गावातील प्रत्येक वाडीतील भजन मंडळे ठरलेल्या प्रहरी रामेश्वर चरणी आपली सेवा सादर करतात. गावाबाहेरील अनेक भजनी मेळे या सप्ताहात सामील होतात व आपले गायन, नृत्य कौशल्य सादर करुन रामेश्वराची सेवा करतात. या नामसंकिर्तनात भक्तजन भजन रुपाने देवाची आराधना करतात. या आराधनेत नामाचा गजर होतो. भक्तीच्या प्रेमरसात रामेश्वर आनंदात न्हावून निघतो. भक्तांना जशी देवाची ओढ असते. तशीच देवालाही भक्ताची ओढ असते. यावेळी देवही भक्तांच्या भेटीला येतो. व हरिनामात सामील होतो. हरिनाम सप्ताहाच्या कालावधीत मंदिरात कोणतेही धार्मिक विधी होत नाहीत. सप्ताहाच्या आठव्या दिवशी मंदिरातून रामेश्वराची पालखी काढली जाते. हरिनामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते व गोपाळकाला केला जातो. गोविंदा- गोविंदाचा जयघोष होतो. पालखी मंदिरात गेल्यावर रामेश्वराचा मंदिरात संचार होतो व तो भक्तजनाना आशीर्वाद देतो. अशा प्रकारे हरिनाम सप्ताहाची सांगता होते.