श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये, कांदळगाव मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे...

महापराक्रमी परशुरामाने पवित्र प्रसिद्ध व प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेली कोकण भूमी निर्माण केली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कोकण व कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग हा जिल्हा निसर्गाने नटलेला आहेच व या जिल्हयातील प्रत्येक गावात परमेश्वराचे अस्तित्व आहे. मालवण शहरापासून उत्तरेला ६ कि. मी अंतरावर वसलेल्या कांदळगाव या गावाला स्वयंभू रामेश्वराचा वरदहस्त लाभला असून महान, कातवड, खैदा, आडारी, न्हिवे, कोळंब या गावाच्या पुर्वीच्या वाड्या असून या सर्वांचे ग्रामदैवत रामेश्वरच आहे. पूर्वेला डोंगरद-या, पश्चिमेला गडनदीचे छोटे पात्र अशी निर्सगाने मुक्त उधळण केलेले कांदळगाव.

सुमारे एक हजार वर्षापूर्वी स्वयंभू रामेश्वर देवस्थान कांदळगावच्या भूमीवर अवतरले. इ. स. ९२० सालातील ही महान घटना आहे. मोठमोठ्या कांदळाच्या झाडांनी वेढलेला हा भाग होता म्हणून या गावाला कांदळगाव हे नाव पडले. त्याकाळी या गावाची लोकवस्ती फारच तुरळक होती. घरेसुद्धा कमी होती. या गावात ब्राह्मणाचे एक घर होते. तो शेतकरी होता. त्याच्याकडे गुरे होती. त्यात एक दुभती गाय होती. ती गाय दूध देत असे. परंतु ते दूध मालकाला मिळत नसे. ब्राह्मणाचा नोकर (गुराखी) गुरांना चारायला नेत असे. एक दिवस त्या ब्राह्मणाने नोकरासह गायीवर पाळत ठेवली.गाईने कांदळवनाने वेढलेल्या जंगलातील एक झुडूपात पान्हा सोडला व तिच्या आचळातून दूध गळू लागले. हा सर्व प्रकार हे दोघे पहात होते. आचळातील दूध संपल्यावर गाय पुन्हा चरायला आली. ब्राह्मणाने नोकराला ते झुडूप साफ करायला सांगितले. झुडूप साफ करता करता हत्याराचा एक वर्मी घाव एका जागेवर बसला व त्या जागेतून भळाभळा रक्त वाहू लागले. नोकर दुःखी झाला. त्याने तो भाग पूर्ण साफ केला. ज्या ठिकाणातून रक्त वहात होते, ती साक्षात पाषाणरुपी शांळूकेसह शंकराची पिंडी होती. ते केवळ शिवलिंग नसून तो साक्षात स्वयंभू रामेश्वर होता. शिवलिंगावर ज्या ठिकाणी घाव बसला त्याची खूण लिंगाच्या डाव्या बाजूला अद्याप आहे. त्यानंतर ही वार्ता गावात पसरली.

त्यावेळी गावात असलेले लोक व ब्राह्मण त्या शिवलिंगाची नित्य- नियमाने पूजाअर्चा करु लागले. अनेक वर्षे लोटली. अनेक पिढ्या ल्या तरी ते शिवलिंग तसेच होते. खरे मंदिराचे स्वरुप आले डिसेंबर १६६४ साली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मालवणला आले होते. तेथील कुरटे बेटावर त्यांनी किल्ला बांधण्याचे ठरविले. अखेर २५ नोव्हेंबर १९६४ मोरयाचा धोंडा येथे विधिवत पूजा करुन शिलान्यास केला व किल्ल्याच्या बांधकामाला प्रारंभ केला. परंतु किल्ल्याच्या पायाचा दगडच टिकेनासा झाला. काही दिवस गेले. महाराज चिंताक्रांत झाले. पायाभरणीला लावलेले मोठाले दगड लाटांच्या मा-यापुढे टिकेनासे झाले. कारागीर पूर्ण हतबल झाले. महाराजांनी किल्ला बांधण्याचा चंगच बांधला होता. कारण अशी मोक्याची जागा पूर्ण कोकणपट्टीत कोठेही नव्हती. एक दिवस महाराज निद्रावस्थेत असताना त्यांना एक दृष्टांन्त झाला. त्यावेळी महाराजांसमोर साधू रुपातील सत्पुरूष आला व तो म्हणाला की, “महाराज हिंमत हरू नका. तुमचे सर्व प्रयत्न सार्थकी लागणार आहेत. हे सर्व करण्यापूर्वी उत्तर दिशेला सहा मैलावर जा. तेथील भूमीवर शिवलिंग अवतरुन त्याला बराच काळ लोटला आहे. त्याला प्रथम निवारा कर व त्याला मंदिराचे स्वरुप प्राप्त करुन त्याची विधिवत पूजा-अर्चा कर व नंतर किल्ल्याच्या बांधकामाला लाग. तुझी इच्छा पूर्ण होईल.” एवढे सांगून तो साधू पुरूष अदृश्य झाला. अदृश्य झालेला तो साधू पुरुष सामान्य नसून तो साक्षात रामेश्वर होता. महाराज जागे झाले व त्यांनी निवडक पाथरवट, काही बांधकामाचे साहित्य घेऊन ते शिवलिंगापर्यंत पोहोचले. त्यांनी गावातील ग्रामस्थांना एकत्र करुन त्या शिवलिंगावर दगडी घुमट एका रात्रीत बांधून पूर्ण केले. व त्याची ब्राह्मणांकडून विधिवत पूजा करून देवालयाचे स्वरुप निर्माण केले व जातेवेळी आठवण म्हणून देवालयासमोर एका वटवृक्षाचे रोपण केले. तो वटवृक्ष अद्याप शाबूत असून इतिहासाची साक्ष देत आहे. त्यालाच ‘शिवाजीचा वड’ असे संबोधले जाते. त्यांनतर किल्ल्याचे बांधकाम सुरु झाले व ते सुरळीतपणे पार पडले. त्यावेळी महाराजांना अनंत अडचणी आल्या. परंतु त्या रामेश्वराच्या कृपाशीर्वादाने दूर झाल्या.

छत्रपतींनी रामेश्वराची घुमटी बांधल्यापासून या भागातील संपूर्ण रयत रामेश्वराला आपले आराध्य दैवत मानू लागले व त्याची भक्तीभावाने आराधना करू लागले. शिवकालीन राजवटीत वेगवेगळे भाग स्वाभाविक व नैसर्गिक स्थितीनुसार बनविण्यात आले होते. त्या भागाला महाल असे संबोधायचे. मालवणच्या दक्षिणेला असलेली कर्ली खाडी व उत्तरेला असलेली कालावलीची खाडी व पूर्वेला कसाल पर्यंत या भागाची हद्द होती. या भागाला साळशी महाल असे नाव होते. शासन दप्तरी अद्याप या नावाची नोंद आहे. या भागातील सर्व जनता रामेश्वराला आपले ग्रामदैवत मानत असत.
कालांतराने मराठेशाहीचा अस्त झाला. त्यानंतर संपूर्ण देशावर इंग्रजांचा अंमल चालू झाला. इंग्रज भारताचे सर्वेसर्वा बनले. इंग्रजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी गव्हर्नर जनरल, व्हाइसरॉय, कलेक्टर यांच्या नियुक्त्या केल्या व त्यांनी देशाचा कारभार सुरळीत चालावा म्हणून जिल्हे, तालुके, गाव यांची निर्मिती केली. प्रत्येक गावाचा कारभार स्वतंत्र केला. याच वेळी साळशी महालाचे अनेक गाव निर्माण झाले. कालांतराने ग्रामस्थांनी आपल्या गावात ग्रामदैवताची स्थापना केली व याच वेळी गावात बारा-पाचाचे पूर्वगणित अर्थात आठ बाराचे पूर्वगणित स्थापन करून वारेसुत्र निर्माण करण्यात आले. वेगवेगळ्या देवतांची वारे काढून भाविक जनतेच्या इच्छा फलद्रुप करणे अशी कामे वारेसुत्राकडून केली जात. यालाच बारा पाचाचे पूर्वगणित असे म्हणतात. त्याकाळी जनतेची ग्रामदैवतावर अढळ श्रद्धा असायची. गावात कोणतीही रोगाची साथ असेल, निसर्गाची अवकृपा असेल वा कोणतेही अरिष्ठ गावावर येवो ती सर्व दूर करण्याची ताकद ग्रामदैवतात होती व आहे. ग्रामदैवत हेच श्रेष्ठ दैवत असा ग्रामस्थांचा विश्वास होता.

कांदळगावचे बारा-पाचाचे पूर्वगणित हे फार पुरातन असून ते प्रख्यात आहे. त्याची प्रचिती अनेक भाविकांना पटली आहे. रामेश्वराच्या पूर्व गणिताची महती अरबी समुद्राच्या काठापासून घाटाच्या माथ्यापर्यंत खूप दूरवर पसरली आहे.

ज्यावेळी कांदळगावच्या बारा-पाचाचे पूर्वगणित स्थापन झाले. त्यावेळे पासूनच रामेश्वराचे मंडान म्हणजेच तरंगासह वारेसुत्राचे रयतेसमवेत आगमन. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आदीमाया भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीला जावू लागले. व ही प्रथा चालू झाली. याच कालावधीत गावातील मानकरी, वडीलधा-यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र करून घुमटावर मंदिर बांधण्याचे निश्चित करून ते काम पूर्णत्वाला नेले. सातेरी व इतर मंदिरेही त्यावेळी स्थापन करण्यात आली.

मंदिराची उभारणी हे मांडपंथी असून प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. प्रवेशद्वारावर गणपती व मारूतीचे घुमट असून बाजूला दीपमाळा आहेत. मंदिराच्या नजीक उत्तरेला रवळनाथ मंदिर, भावई मंदिर तर दक्षिणेला राणेवंशाची कुलस्वामिनी मंदिर आहे. रामेश्वर मंदिरापासून नजीकच उत्तरेला श्री देवी सातेरी मंदिर असून ती सर्वांची कुलदेवता आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला परब कुलवंश्याचे कुलदेवता मंदिर आहे. त्याच्या डाव्या बाजूस बाराचा पुर्वस व मायेचा पुर्वस हे मंदिर असून बाजूला स्वर्गीय बाबा गावकर यांचे स्मृतीस्थळ आहे. वार्षिक दसरा उत्सव संपन्न होतो. त्या जागेला रामेश्वराचा बाराचा मांड असे म्हणतात. हा मांड भव्य असून मांडाच्या पश्चिमेला रामेश्वराची गादी आहे. वार्षिक जत्रोत्सवाच्या (दहीकाला) दुस-या दिवशी दह्याचे गाडगे फोडण्याच्या वेळी फक्त एक वेळा रामेश्वर त्या गादीवर स्थानापन्न होतात. रामेश्वराच्या सभामंडपात सुद्धा रामेश्वराची गादी असून या गादीवर रामेश्वर रामनवमी उत्सवात (पाडवा ते रामनवमी) स्थानापन्न होतात. व भाविक प्रजाजनाना आशीर्वाद देतात. मंदिराच्या लगतच डाव्या बाजूला तुळशी वृंदावन असून तुळशी विवाहाला रात्रौ विवाह सोहळा संपन्न होतो. गावातील रामेश्वराचे मानकरी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित असतात. मंदिराच्या डाव्या बाजूला कोनामध्ये मोठी पाण्याची तळी असून तिला देवाची तळी असे म्हणतात. हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनंतर काल्याला या तळीतील पाण्याने पवित्र स्नान केले जाते.

रामेश्वर मंदिराचे सन २००२ मध्ये नूतनीकरण करण्यात आले असून मंदिरावर दोन सुवर्णकलश बसविण्यात आले असून या कलशाचे आरोहन करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या नूतनीकरणासाठी गावातील व गावाबाहेरील दानशूर ग्रामस्थांनी मदत केली आहे. जानेवारी महिन्यात पौष कृष्णपक्ष दशमी या तिथीला मंदिरात सुवर्णकलशाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न होतो.