श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये, कांदळगाव मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे...

महापराक्रमी परशुरामाने पवित्र प्रसिद्ध व प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेली कोकण भूमी निर्माण केली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कोकण व कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग हा जिल्हा निसर्गाने नटलेला आहेच व या जिल्हयातील प्रत्येक गावात परमेश्वराचे अस्तित्व आहे. मालवण शहरापासून उत्तरेला ६ कि. मी अंतरावर वसलेल्या कांदळगाव या गावाला स्वयंभू रामेश्वराचा वरदहस्त लाभला असून महान, कातवड, खैदा, आडारी, न्हिवे, कोळंब या गावाच्या पुर्वीच्या वाड्या असून या सर्वांचे ग्रामदैवत रामेश्वरच आहे. पूर्वेला डोंगरद-या, पश्चिमेला गडनदीचे छोटे पात्र अशी निर्सगाने मुक्त उधळण केलेले कांदळगाव.

सुमारे एक हजार वर्षापूर्वी स्वयंभू रामेश्वर देवस्थान कांदळगावच्या भूमीवर अवतरले. इ. स. ९२० सालातील ही महान घटना आहे. मोठमोठ्या कांदळाच्या झाडांनी वेढलेला हा भाग होता म्हणून या गावाला कांदळगाव हे नाव पडले. त्याकाळी या गावाची लोकवस्ती फारच तुरळक होती. घरेसुद्धा कमी होती. या गावात ब्राह्मणाचे एक घर होते. तो शेतकरी होता. त्याच्याकडे गुरे होती. त्यात एक दुभती गाय होती. ती गाय दूध देत असे. परंतु ते दूध मालकाला मिळत नसे. ब्राह्मणाचा नोकर (गुराखी) गुरांना चारायला नेत असे. एक दिवस त्या ब्राह्मणाने नोकरासह गायीवर पाळत ठेवली.गाईने कांदळवनाने वेढलेल्या जंगलातील एक झुडूपात पान्हा सोडला व तिच्या आचळातून दूध गळू लागले. हा सर्व प्रकार हे दोघे पहात होते. आचळातील दूध संपल्यावर गाय पुन्हा चरायला आली. ब्राह्मणाने नोकराला ते झुडूप साफ करायला सांगितले. झुडूप साफ करता करता हत्याराचा एक वर्मी घाव एका जागेवर बसला व त्या जागेतून भळाभळा रक्त वाहू लागले. नोकर दुःखी झाला. त्याने तो भाग पूर्ण साफ केला. ज्या ठिकाणातून रक्त वहात होते, ती साक्षात पाषाणरुपी शांळूकेसह शंकराची पिंडी होती. ते केवळ शिवलिंग नसून तो साक्षात स्वयंभू रामेश्वर होता. शिवलिंगावर ज्या ठिकाणी घाव बसला त्याची खूण लिंगाच्या डाव्या बाजूला अद्याप आहे. त्यानंतर ही वार्ता गावात पसरली.

श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये, कांदळगाव मध्ये साजरे केले जाणारे सण/उत्सव :

नववर्ष पाडवा ते रामनवमी उत्सव :

कांदळगावच्या रामेश्वरच्या रामनवमीचा प्रारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होतो. दुपारी ११ वाजता सर्व मानकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नववर्षाची गुढी रामेश्वर मंदिरात वाजत गाजत चैतन्यपूर्ण वातावरणात उभारली जाते व त्यानंतर गावात सर्वत्र घरोघरी गुढ्या उभारल्या जातात ही गावाची परंपरा अद्याप चालू आहे.

वार्षिक दसरोत्सव :

अश्विन शुद्ध दशमीला रामेश्वर मंदिरात दसरोत्सवाला प्रारंभ होतो. दुपारी ४ वाजता रामेश्वर मंदिरातून रामेश्वर, गांगेश्वर, सातेरी, रवळनाथ, कमरादेवी यांची तरंगासह वारेसुत्रे व इतर सह- वारेसुत्रासह तमाम रयत सोबत घेवून सातेरी मंदिराकडे प्रयाण करतात. मंदिराशेजारी मोठे आपट्याचे झाड आहे.

महाशिवरात्री उत्सव :

माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्री या दिवशी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी चालू असते. सकाळी शिवपिंडीवर धार्मिक विधी करण्यात येतात. रात्रौ पुराण वाचन व रामेश्वराच्या वारेसुत्रासह पालखी सोहळा, रामेश्वर मंदिर प्रदक्षिणा व सातेरी मंदिर व परिसरातील इतर मंदिरांना भेटी देऊन संपन्न होतो.